Ad will apear here
Next
मुक्ता टिळक पुण्याच्या महापौर
पुण्याच्या महापौरपदी मुक्ता टिळक, तर उपमहापौरपदी नवनाथ कांबळे यांची निवड झाली.पुणे : पुणे महापालिकेच्या ५६व्या महापौर म्हणून मुक्ता टिळक यांच्या निवडीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. बुधवारी (१५ मार्च) झालेल्या निवडणुकीत टिळक यांना ९८, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नंदा लोणकर यांना ५२ मते मिळाली. पुणे महापालिकेच्या ६७ वर्षांच्या इतिहासात महापौरपदी विराजमान होणाऱ्या टिळक या भारतीय जनता पक्षाच्या पहिल्याच नेत्या आहेत. तसेच त्या पुण्याच्या नवव्या महिला महापौर झाल्या आहेत. उपमहापौरपदी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे नवनाथ कांबळे निवडून आले. काँग्रेसच्या लता राजगुरू यांचा त्यांनी पराभव केला. 
महापौर टिळक आणि उपमहापौर कांबळे या दोघांनाही पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर आदींनी शुभेच्छा दिल्या. 


 ‘शाश्वत विकास महत्त्वाचा’
‘पुणे शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करणार, खर्चावर मर्यादा आणणार, महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावणार,’ अशी ग्वाही देतानाच ‘पुणेकर हाच आपल्या कामकाजाचा केंद्रबिंदू असेल,’ असा शब्दही टिळक यांनी दिला. ‘भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेली ६७ वर्षे केलेल्या कामामुळे मिळालेले हे फळ आहे. सर्वांच्या मदतीने ‘आधुनिक शहर’ अशी पुण्याची ओळख निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील,’ असेही टिळक म्हणाल्या.

मुक्ता टिळक यांच्याबद्दल...
पुणे महापालिकेत या वेळी भाजपचे ९७ नगरसेवक निवडून आल्यामुळे पक्षाला एकहाती सत्ता स्थापन करता आली आहे. मुक्ता टिळक यांची नगरसेवक म्हणून निवडून येण्याची ही चौथी वेळ असून, या वेळी त्या तब्बल २३ हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या. याआधी त्यांनी पालिकेतील स्थायी समितीसह अन्य सर्व समित्यांवर काम केले असून, २००७ ते २०१२ या कालावधीत त्या भाजपच्या गटनेत्या होत्या. मुद्देसूदपणे प्रभावी भाषण करण्याची त्यांची हातोटी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पहिला महापौर बनण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्षे होत असतानाच टिळक कुटुंबीयांकडे पुण्याच्या महापौरपदाची सूत्रे जाणे हा एक योगायोगच आहे. 
मुक्ता टिळक यांनी मानसशास्त्रातून एमए केले असून, जर्मन भाषाही त्यांना अवगत आहे. मार्केटिंग एमबीए, तसेच पत्रकारितेचे शिक्षणही त्यांनी घेतले आहे. त्यांचे पती शैलेश हे आंतरराष्ट्रीय ज्युदोपटू असून, विविध सामाजिक संस्थांवर काम करतात. 

नवनाथ कांबळे यांच्याविषयी...
१९९७मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झालेले नवनाथ कांबळे यांची महापालिकेत निवडून येण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्या वेळी ते स्थायी समितीचे सदस्य होते, तर दुसऱ्या वेळी ते शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष होते. आता तिसऱ्या वेळी त्यांना उपमहापौरपदाचा मान मिळाला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कांबळे यांनी हे यश मिळवले आहे. दुष्काळामुळे कांबळे यांचे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. उपजीविकेसाठी त्यांनी शेंगा विकण्याचे काम केले आहे. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी समाजसेवा सुरू केली. सुरुवातीला ते दलित पँथर चळवळीशी जोडले गेले. ‘आरपीआय’चे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. बोपोडीतील ठ. रा. पाडळे यांच्यानंतर तब्बल ५७ वर्षांनी ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्याला पुणे महानगरपालिकेतील हे महत्त्वाचे पद मिळाले आहे.


नितीन काळजे पिंपरीचे महापौर
पुण्याजवळच्याच पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपचीच सत्ता आली आहे. भाजपचे नितीन काळजे यांची महापौरपदी, तर भाजपच्याच शैलजा मोरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. मंगळवारी ही निवडप्रक्रिया झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड झाली.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZGOBA
Similar Posts
मंजूषा मुळीक बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ पुणे : ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ या सौंदर्य स्पर्धेचा दुसरा सिजन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. उंची, व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेले गुण या निकषांवर मंजूषा मुळीक यांनी ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ चा किताब पटकावला.
साडेपाच हजार कोटींचा अर्थसंकल्प पुणे : २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचा पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी (३० मार्च) स्थायी समितीसमोर सादर केला. हा अर्थसंकल्प पाच हजार ६०० कोटी रुपयांचा आहे. पालिकेच्या प्रमुख आर्थिक स्रोतांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा निर्माण झाल्याने ‘अथ’पासून ‘इति’पर्यंत
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा पिंपरी-चिंचवड : शहरात प्रथमच राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका, इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड अमॅच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी महापौर संजोग
घरेलू कामगार महिलांचा सत्कार! पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यातील कसबा मतदारसंघात आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त घरेलू कामगार महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला १०० घरेलू कामगार महिला उपस्थित होत्या. या वेळी प्रत्येक महिलेला प्रशस्तिपत्रक, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language